।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।
रोज काहीतरी देवधर्म केल्याशिवाय अन्न घेऊ नका. देवधर्म करण्याच्या अनेक बाबी आहेत. त्यात काही जमले नाही तर निदान नामस्मरण करा. रामरक्षा, हनुमानकवच, अवतरणिका अशी काही छोटी स्तोत्रे आहेत, ती नित्य वाचा. त्यातून एक शक्ती निर्माण होते व ती तुमचे रक्षण करेल. केवळ माझे आशीर्वाद घेतले कि संपले असे होता कामा नये. माझी कृपा तर आहेच, पण केवळ तेवढ्यावर राहू नका. सेवा म्हणून काहीतरी करीत जा.
काही वेळा अज्ञानाने माणूस चुका करीत असतो, त्याला क्षमा आहे. पण जाणत्या माणसाने जर या चुका केल्या तर मात्र पाप आहे. त्याला क्षमा नाही व प्रायश्चित्त म्हणून शिक्षा ही निश्चितच आहे. तुमची ईश्वरावर नुसती निष्ठा असून भागत नाही. निष्ठेला कर्माची जोड असेल तर त्या निष्ठेला एक विशेष शक्ती येते.