मिंटी मशरूम रोल्स

साहित्य : ४ उकडलेले बटाटे (मॅश करून दोन कप व्हायला हवेत), कडा काढलेल्या ब्रेडच्या दोन स्लाईसेस चुरून (ब्रेड क्रम्ब्स), अर्धा छोटा चमचा गरम मसाला,अर्धा छोटा चमचा लाल तिखट, तळणासाठी तेल, अंड्यातील पांढरा बलक व ब्रेड क्रम्ब्सचे मिश्रण कोटिंगसाठी. 
सारण : १ मोठा चमचा बटर, १५० ग्रॅम मशरूम्स बारीक चिरून (दीड कप ), पाव कप बारीक चिरून पुदीना, १ मोठा कांदा बारीक चिरून ( अर्धा कप ), मीठ व मिरपूड चवीनुसार. 
कृती : बटाटे उकडून घ्या. गरम असतानाच मॅश करून घ्या नाहीतर थंड झाल्यावर किसून घ्या. यात ब्रेड क्रॅब्स, गरम मसाला, तिखट, मीठ घालून मिसळा. चव घेऊन बाजूला ठेवा. सारण तयार करण्यासाठी बटर पातेल्यात गरम करा. कांदा घालून तो मऊ होईपर्यंत परतवा. मशरूम्स घालून ३ - ४ मिनिट परातवा. त्यांच्यामधील पाणी सुकून ते कोरडे व्हायला हवेत. पुदिना, मीठ आणि मिरपूड घालून चांगले परतवा व गॅस बंद करून सारण थंड होऊ द्या. बटाट्याच्या मिश्रणाचे सारखे ८ भाग करा. प्रत्येक भागाचा लांबट पोळीसारखा आकार करून त्यात एकेक चमचा वरील सारण भरा व त्यांचे रोल्स तयार करा. अंड्यातील पांढरे १ मोठा चमचा पाण्यात फेटून त्यात हे रोल्स बुडवून लगेच काढा व ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळा. तेलामध्ये सोनेरी ब्राऊन होईपर्यंत तळा. टोमॅटो सॉस, पुदिना किंवा खजुराच्या आंबटगोड चटणीसोबत वाढा.