गुलनार सीख कबाब

साहित्य : १ कप मसूरडाळ धुवून, इंचभर आले, ८ - १० लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा लाल तिखट, ३ ब्रेडच्या स्लाईसेस पाण्यात भिजवून व घट्ट पिळून, १ छोटा चमचा मीठ, ३ मोठे चमचे तेल, प्रत्येकी २ मोठे चमचे हिरवी सिमला मिरची, कांदा, लाल सिमला मिरची (हिरवीसुद्धा चालेल ). 

वाढण्यासाठी : २ कांदे चकत्या कापून, एका लिंबाचा रस, थोडी पुदिन्याची पाने बारीक चिरून. 

कृती : डाळ सुमारे दोन तास भिजत घाला. गाळून आले, लसूण  व जिऱ्यासोबत कमीतकमी पाण्यांत मिक्सरमधून घट्ट पेस्ट बनवा. बाजूला ठेवा. जाड बुडाच्या कढईत तेल गरम करून ही पेस्ट मंद आचेवर ४ - ५ मिनिट सुकेपर्यंत व तळाला चिकटणे थांबेपर्यंत परतावा. खाली उतरवा. ब्रेड चुरून त्यात गरम मसाला, मीठ, तिखट व डाळीची पेस्ट चांगली मिसळून बाजूला ठेवा. कबाब तळण्यासाठी कढईत तेल गरम करा. लाकडाच्या किंवा धातूच्या सळईवर या पेस्टचे बोटासारखे दोन इंच जाडीचे आकार थापा. त्यावर बारीक चिरलेल्या कांद्याचे व सिमला मिरच्यांचे तुकडे बाहेरून हाताने दाबून घट्ट बसवा. आता हे कबाब हळूच सळईतून काढून तेलात सोनेरी ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. वाढताना वरून लिंबू पिळा व कांद्याच्या रिंग्जमध्ये पुदिन्याच्या पानांनी सजवून गरमच वाढा.